सात लाख द्या, मंत्रालयात नोकरी लावून देतो...बनावट नियुक्ती पत्र देवुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या दाम्पत्यास अटक
मीरा भाईंदर: भाईंदर येथील एका तरुणाला मंत्रालयात लिपीक पदावर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका दाम्पत्याने 4 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. 1 सप्टेंबर 2024 रोजी भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, समांतर तपास करणाऱ्या मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या केंद्रीय गुन्हे शाखेला मालाड आणि मीरा रोड येथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश आले.
वास्तविक, पीडित तरुण आणि आरोपी उत्तन डोंगराचा एका बँड ग्रुपमध्ये सामील होते. दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. 2018 दरम्यान हा तरुण नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी आरोपी सागर कासारे याने पीडित तरुणाला 'माझ्या पत्नीची मंत्रालयात चांगली आळख आहे, ती तुला तिथे कामाला लावते, पण मंत्रालयात नोकरी लावण्यासाठी 07 लाख रुपये लागतील', असे सांगितले. सरकारी नोकरी मिळण्याच्या आशेने या तरुणाने सागरच्या बोलण्यावर विश्वास व्यक्त केला. त्यानुसार, ऑगस्ट 2019 मध्ये तरुणांनी सागरला ₹ 80 हजार आणि सप्टेंबर 2019 मध्ये ₹ 40 हजार रोख दिले.
त्यानंतर 5 नोव्हेंबर 2019 रोजी सागरने तरुणाला नियुक्तीपत्र देऊन 3 लाख रुपये घेतले. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर तरुणाने सागरला नोकरीला कधी रुजू होऊ असे विचारले असता, सुरुवातीला १५-२० दिवस थांबायला सांगितले, नंतर काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत होता. तरुणाला संशय आल्याने त्याने हे नियुक्तीपत्र उच्च न्यायालयात काम करणाऱ्या त्याचा मामांना दाखविले. त्यानंतर तरुणाच्या मामाने हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगितले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुण थेट सागरच्या घरी गेला. सागरने हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे मान्य केले आणि काही दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासनही दिले. डिसेंबर 2020 मध्ये आरोपी सागर कासारे आणि प्रीती कासारे यांनी स्टॅम्प पेपरवर 15 दिवसात पैसे परत करतो असे लिहून दिले होते. असे असतानाही त्यांनी १५ दिवसांत पैसे परत केले नाहीत.
अखेर 03 मे 2021 रोजी सागरने पीडित तरुणाला 4 लाख रुपयांचा धनादेश दिला. बँकेत जमा केल्यानंतर तो चेकही बाऊन्स झाला. अखेर सागर कासारे व त्यांच्या पत्नीविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीने अशाच पद्धतीने भाईंदर येथील आणखी 3 ते 4 लोकांना नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.