विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील नेत्यांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


मीरा भाईंदर: विधानसभा निवडणुका जवळ आल्याने शहरातील अनेक विकासकामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम आणि धार्मिक गुरू / कथा वाचकांना आमंत्रित करून कथाकथन/सत्संगाचे आयोजन शहरातील माजी/विद्यमान आमदारांकडून करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसात मीरा भाईंदर शहराच्या विद्यमान आमदार गीता जैन यांच्या हस्ते महावीर भवन आणि उत्तर भारतीय भवनाचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. तसेच आमदार गीता जैन यांनी मीरा रोड येथिल सेंट्रल पार्क मैदानावर जगद्गुरू रामभद्राचार्य महाराज यांच्या आठवडाभर श्री राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हे सुरू असताना, शहरातील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी 13 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत भाईंदर येथील लोटस मैदानावर कथाकार जया किशोरी यांचा सत्संग कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. जया किशोरी या भारतातील प्रसिद्ध कथाकार तसेच एक चांगली मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील लोटस नवरात्री उत्सवात प्रसिद्ध गायक, अभिनेता / टीव्ही कलाकार, नेते उपस्थित राहणार आहे.

आजी-माजी आमदारांनी आयोजित केलेले धार्मिक कार्यक्रम पाहून आता आमदार प्रताप सरनाईक हे 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी भाईंदर पूर्व येथील स्व.बाळासाहेब ठाकरे मैदानावर भागवत सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती मिळाली आहे. श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील. 

तसेच बालयोगी श्री सदानंद महाराज, गजानन ज्योतकर गुरुजी (अयोध्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना पुरोहित), जगदुरु रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य "विद्याभास्कर" जी महाराज, जगदुरु शंकराचार्य स्वामीश्री सदानन्द सरस्वती जी महाराज, स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज (कोषाध्यक्ष- राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास, अयोध्या) देखील सत्संगात उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

वास्तु व चौकांचे उद्घाटन कार्यक्रम

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना निधी व आमदार निधीतून बनविलेल्या अनेक वास्तु व चौकांचे उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते रविवार, 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.

यामध्ये इंदिरा नगर (भाईंदर पूर्व) येथील धरमवीर आनंद दिघे मैदानातील समाज मंदिर व खुले नाट्यगृह, नवघर गाव येथिल गावदेवी मंदिराशेजारी खुले नाट्यगृह, रामदेव पार्क चौकातील मराठा स्तंभ, राष्ट्रीय महामार्ग क्र.८, फाउंटन चौक ते घोडबंदर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकामध्ये लोकशाहीर विश्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक आणि घोडबंदर गावातील समाज मंदिर व व्यायामशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचा समावेश आहे.

दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक सायकल व कानाचे मशिन वाटप

तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक सायकल व कानाचे मशिन वाटप कार्यक्रम रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता आमदार प्रताप सरनाईक यांचे जनसंपर्क कार्यालयतून होणार आहे.