हिट अँड रन प्रकरणी बावनकुळे पुत्रावरही कारवाई झाली पाहिजे - मुझफ्फर हुसैन
नागपूर : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या मालकीच्या आलिशान कारने सोमवारी नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली, त्यानंतर चालकासह त्यातील दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. अपघाताच्या वेळी कारमध्ये पाच जण होते, मात्र संकेत बावनकुळे यांच्यासह तिघेजण पळून गेले होते. यात पोलीस बावनकुळे पुत्रास वाचवीत असल्याचा आरोप काँग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन यांनी केला आहे.
बेदरकार पणे कार चालवणाऱ्या व स्वतःच्या मालकीची कार असताना, अपघात होऊन देखील पोलीस सत्ताधारी भाजप नेत्याच्या पुत्रास का वाचवत आहेत, कायदा यांच्यासाठी वेगळा आहे का? असा सवाल हुसैन यांनी केला आहे.
पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ऑडी कारची प्रथम तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला आणि नंतर मोपेडची धडक बसली, यात दुचाकीवरील दोन तरुण जखमी झाले. हे सर्व बिअर बारमधून येत होते, असे सूत्रांनी सांगितले. चालक आणि अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
"ऑडी कारने मानकापूर भागाकडे जाणाऱ्या आणखी काही वाहनांना धडक दिली. तिथल्या टी-पॉइंटवर पोलो कारला गाडीने धडक दिली. तिथल्या प्रवाशांनी ऑडीचा पाठलाग करून मानकापूर पुलाजवळ ती थांबवली. संकेत बावनकुळे यांच्यासह तिघेजण पळून गेले," वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने सीताबर्डी पोलिस ठाण्यातील एका अज्ञात अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे सांगितले.
"कारचा चालक अर्जुन हावरे आणि आणखी एक प्रवासी, रोनित चित्तमवार, यांना पोलो कारमधील प्रवाशांनी थांबवले. त्यांना तहसील पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तेथून त्यांना पुढील तपासासाठी सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले," ते म्हणाले.
"सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून रॅश ड्रायव्हिंग आणि इतर गुन्ह्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे," असे सीताबर्डी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
"पुणे येथील पोरशे कार अपघात प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार सहभाग असो वा शिंदे सेनेच्या नेत्याने वरळी येथील महिला हत्या प्रकरण असो, वा यापूर्वीच्या अनेक घटनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असूनही महायुती सरकार मधील नेत्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना वाचवण्याचे काम गृहमंत्री फडणवीस यांनी केले आहे, गृहखाते सक्षम पणे हाताळण्यास फडणवीस सपशेल फेल ठरले असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, " अशी मागणी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन यांनी केली आहे.
या घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑडी कार त्यांचा मुलगा संकेत याच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे मान्य केले. "पोलिसांनी कोणताही पक्षपात न करता अपघाताचा सखोल आणि निःपक्षपातीपणे तपास करावा. जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. मी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याशी बोललो नाही. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे," असे बावनकुळे यांनी एक विडिओ शेअर करतआपल्या X अकाउंट वर पोस्ट केली आहे.