वर्षभरात नागरिकांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या एकूण 25 कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान.
आज दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना अनुसरून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर रोजी पर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेचा सांगता कार्यक्रम दिनांक 2 ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री. दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत नगरभवन, मांडली तलाव येथील सभागृहात संपन्न झाला. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (जनसंपर्क) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबीत, अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे, नगरसचिव वासुदेव शिरवळकर, प्र. मुख्य लेखा परीक्षक मंजिरी डिमेलो, मुख्य लेखाधिकारी अजित कुलकर्णी व सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास व मार्गदर्शक म्हणून दूरदर्शन वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये व दैनिक पुढारीचे राजू काळे उपस्थित होते.

सदर कार्यक्रम प्रसंगी मागील वर्षभरात नागरिकांना उत्कृष्ट अशी सेवा देणारे कनिष्ठ अभियंता, अग्निशमन विभाग कर्मचारी, परिवहन सेवा, आशा वर्कर, स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी, संगणक चालक अश्या एकूण 25 कर्मचाऱ्यांची निवड करत महानगरपालिका मा. आयुक्त, मा. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. मिरा भाईंदर महानगरपालिका सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्साह व शहरातील नागरिकांना सेवा देण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करावे म्हणून हा गौरव सन्मान फक्त यावर्षी करण्यात येणार नसून पुढील काळात सुद्धा करण्यात येणार आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका नागरिकांना विविध क्षेत्रात सेवा देण्यात अग्रेसर झाली असून यापुढील काळात विशिष्ट पद्धतीने आणखी कोणत्या मूलभूत सेवा तातडीने देण्यात येतील यावर विशेष भर देत जोमाने काम करू असे मा. आयुक्त यांनी नमूद केले. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा ही विशेष मोहीम उत्कृष्टरित्या राबवून 986 पैकी 934 अर्जांचे निवारण केल्याने मा. आयुक्त यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उर्वरित अर्ज हे मागील 2 दिवसात प्राप्त झाल्याने त्यांचे सुद्धा निवारण येत्या तीन दिवसात करण्यात येणार असल्याचे मा. आयुक्त यांनी स्पष्ट केले.

मागील एका वर्षात मिरा भाईंदर महानगरपालिकेने सर्व उपक्रम उत्तमरीत्या राबवून कोविड योद्धा पुरस्कार, सकाळ सन्मान पुरस्कार, शहरातील नागरिकांना ऑनलाईन 48 सेवा दिल्याने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज, माझी वसुंधरा, इंडियन स्वच्छता लीग, स्वच्छ सर्वेक्षण 2022 पुरस्कार, सोशल मीडिया जनजागृती सन्मान मिळवला आहे हे सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले असून यापुढेही अशीच सेवा शहरातील नागरिकांना देत राहू असे मत व्यक्त करत आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.