मीरा भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई व ठाणे लगतचे शहर असलेल्या मीरा भाईंदर हे शहर सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा रोड (पूर्व ) महाजनवाडी येथे स्केटींग रिंगचे लोकार्पण, महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमीपुजन, भाईंदर (प.) येथील चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण, घोडबंदर येथील महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचे भूमिपुजन, भाईंदर (पूर्व) येथील महाराणा प्रताप पुतळ्याचे व मिरारोड (पूर्व) येथील भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी राज्य आदीवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत, खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, पराग शहा, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर निर्मला सावळे, मिरा भाईंदर भाजपा जिलाध्यक्ष रवी व्यास, राजू भोईर, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने मीरा भाईंदर शहरात अत्याधुनिक नाट्यगृह उभारले आहे. राज्यासाठी आणि देशासाठी लता दीदींचे अमूल्य योगदान आहे. लता दिदींच्या नावामुळे नाट्यगृहाची उंची वाढली आहे. त्याचप्रमाणे शहरात उभारलेल्या महाराणा प्रताप व शूरवीर चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्यांमुळे पुढील पिढीला त्यांचा पराक्रम कळेल व प्रेरणा मिळून देशाभिमान जागृत होईल. मूलभूत सुविधा बरोबरच अश्या प्रकारच्या विरंगुळ्याच्या वास्तू उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाची व प्रतिनिधींची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. मीरा-भाईंदर परिसरातील लहान मुलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने केलेली कामे कौतुकास्पद आहेत.
बांधकाम टीडीआरमुळे चांगल्या वास्तू उभ्या राहत आहेत. मोठ मोठी प्रकल्पे बांधण्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध असेलच असे नाही. अशा मोठ्या प्रकल्पांची बांधकामे महापालिकेचा पैसा न वापरता बांधकाम टीडीआरमधून बांधल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असेही शिंदे म्हणाले.
हे शासन लोकाभिमुख शासन असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने शासन सदैव प्रयत्नशील आहे. या शासनाने गेल्या शंभर दिवसात सामान्य माणसाच्या विकासासाठी व सामान्य माणसाच्या हिताचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विकास कामे मार्गी लावणार आहोत. जनतेच्या विकासासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येत आहेत.
आपण लोकांशी बांधील आहोत लोकांना न्याय दिला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राच्या सहकार्यामुळे राज्यातील मोठमोठे प्रकल्प मार्गी लागत आहेत. जे प्रकल्प केंद्राला पाठवले जातात ते ताबडतोब त्वरित मंजूर करून मिळत आहेत. नगरविकास विभागाचा सोळा हजार कोटींची निधीस केंद्राने मंजुरी दिली आहे.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहामुळे शहरातील सांस्कृतिक गरज भागणार आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर शहरातील विविध विकासकामांसाठी कधीच निधी कमी पडू दिला नाही. भविष्यातही शहराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.
आमदार गीता जैन म्हणाल्या की, मीरा भाईंदर शहरातील कालाप्रेमीं साठी आजचा दिवस महत्वाचा आहे. मुंबईला जाणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जलमार्गाचा प्रकल्प आराखडा मंजूर करून केंद्राकडे पाठवावा. तसेच दहिसर चेक नाक्याची समस्या सोडवावी.
मिरा भाईंदर महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्केटिंग रिंगच्या उद्घाटन वेळी चिमुकल्यानी स्केटिंग करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी या चिमुकल्या सोबत छायाचित्र काढून त्यांचे कौतुक केले.
बालयोगी श्री सदानंद महाराज यांनी सामाजिक जाणिव ठेवून लोकांचे जीवनात बदल घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
भाईंदर मधील राई गावात आयोजित बालयोगी सदानंद महाराज आयोजित रामभक्त गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल राम नाईक, बालयोगी श्री सदानंद महाराज, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, नरेंद्र मेहता, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सदानंद महाराज हे राज्याचे वैभव आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीचे हिंदी भाषांतर करून जगभर पोचविण्याचे काम केले. ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा देशभर आयोजित करण्याचा संकल्प सदानंद महाराज यांनी केला आहे. बालयोगी सदानंद महाराजांच्या वास्तव असलेल्या ठिकाणी गेल्यावर वेगळीच भावना व अनुभूती निर्माण होते. सदानंद महाराज हे सामाजिक सुधारणेचे अग्रदूत आहेत. परिवर्तन घडविण्याचे काम ते करत आहेत. बाबांमुळे व्यसनमुक्तीचे काम होत आहे. बाबांच्या दर्शनाने लोकांसाठी, चांगले काम करण्याचे बळ मिळते. महाराष्ट्राला वारकरी परंपरेचा मोठा वारसा मिळाला आहे. विश्वशांतीमुळे मानवकल्याणाचा संदेश मिळतो आहे.