मीरा भाईंदर शहर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात अव्वल मानांकित
'स्वच्छ सर्वेक्षण 2022' मध्ये मीरा भाईंदर शहराने देशात बाजी मारत महानगरपालिका गटात पारितोषिक मिळवले आहे. मीरा भाईंदर शहर 3 लाख ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आले असून देशपातळीवर 7 व्या स्थानी मानांकित झाले आहे.
'कचरामुक्त शहर' या गटात 3 स्टार मानांकनासह विशेष बक्षिसे देखील पटकविलेली आहेत. सिटीझन फीडबॅक मध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक देखील संपादन केला आहे. देशपातळीवर झालेल्या या सर्वेक्षणात 4300 पेक्षा जास्त शहरांनी सहभाग घेतला होता. महानगरपालिका स्तरावर या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर खूप आव्हाने समोर होती. 7500 गुणांच्या या स्पर्धेत विविध बाबी तपासल्या गेल्या. महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतल्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगार यांच्यात चैतन्य संचारले आहे.
याच कामाची दखल घेत आज जाहीर झालेल्या या बक्षिसांच्या यादीत मीरा भाईंदर शहराचा समावेश करण्यात आला आहे. तत्कालीन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्याचे पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक,आमदार गीता जैन, आणि खासदार राजन विचारे यांच्या सहकार्याने मीरा भाईंदर शहराने आपला नावलौकिक उंचावला आहे. या बहुमानाबद्दल महापालिका आयुक्त दिलीप ढोले , माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत आणि सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या सर्व टीम चे अभिनंदन.